Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Heat Rain Jalgaon News जळगावात तापमान चाळिशीपार, १६-१७ मे दरम्यान पावसाची शक्यता



Weather जळगाव न्यूज : शहर व जिल्ह्यात १३ मेपासून उष्णतेची लाट वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, येत्या काही दिवसांत तापमान पुन्हा चाळिशीपार जाण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. विशेषतः १६ ते १८ मे दरम्यान कमाल तापमान ३९ ते ४२ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात तापमान तुलनेने आटोक्यात होते. यामध्ये हलक्या गारव्यासह ढगाळ वातावरणाची नोंद झाली होती. सोमवारी दुपारनंतर देखील आकाशात ढग जमून पावसाचे संकेत मिळाले; मात्र प्रत्यक्षात पाऊस झाला नाही.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १६ व १७ मे रोजी दुपारनंतर हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मात्र, गारपीट होण्याची शक्यता नाही. १८ मे रोजी तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ होऊन कमाल तापमान ४२ अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

तसेच, पश्चिमेकडून येणारे मध्यम गतीचे वारे (३० ते ३५ किमी/ताशी) जिल्ह्यात सक्रिय राहतील. त्यामुळे वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण वाढण्याचीही शक्यता आहे, जे उष्णतेची तीव्रता अधिक जाणवायला लावू शकते.

जिल्ह्यातील नागरिकांना उष्माघात व उष्मा संबंधी आजारांपासून बचावासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः वृद्ध, लहान मुले आणि शेतकऱ्यांनी उन्हात काम करताना काळजी घ्यावी. उन्हाच्या वेळात शक्यतो बाहेर जाणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि शरीर थंड ठेवण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.

उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात तापमानात होणारी ही वाढ, तसेच पावसाची शक्यता शेतकरी बांधवांसाठीही महत्त्वाची ठरू शकते. हवामानात होणाऱ्या बदलांवर सतत लक्ष ठेवून शेती संदर्भातील निर्णय घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.










टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या