दोन यूट्यूबर्सनी अपलोड केलेल्या या व्हिडिओंमध्ये महाजन यांच्याविरोधात काही गंभीर आरोप करण्यात आले होते. न्यायालयाने हे व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यामध्ये असलेल्या विधानांचा विचार करत हे आदेश दिले. खंडपीठाने म्हटले आहे की, या “व्हिडिओमधील विधाने आणि ट्रान्सक्रिप्ट्स पाहता, ती माझ्या प्रथमदर्शनी दृष्टिकोनातून मानहानीकारक आहेत.” त्यामुळे संबंधित व्हिडिओ त्वरित हटवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.
तसेच, यापुढे गिरीश महाजन यांच्याविरोधात अशाच स्वरूपाचे कोणतेही व्हिडिओ किंवा पोस्ट सोशल मीडियावर अपलोड न करण्याचा आदेशही न्यायालयाने याच यूट्यूबर्सना दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २० जून रोजी होणार आहे.
या प्रकरणात गिरीश महाजन यांनी पत्रकार अनिल थत्ते आणि आणखी एका व्यक्तीविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. या आरोपांमध्ये महाजन यांच्यावर एका महिला IAS अधिकाऱ्याशी कथित संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी देखील टीका केली होती. मात्र, महाजन यांनी या आरोपांना खोटे, बेजबाबदार आणि निराधार ठरवले होते.
महाजन यांनी सांगितले की, कोणतेही ठोस पुरावे नसताना केलेले हे आरोप त्यांच्या सामाजिक आणि राजकीय प्रतिमेला मोठी हानी पोहोचवणारे आहेत. त्यांनी कायदेशीर मार्गाचा अवलंब करत न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे.
या घडामोडींमुळे महाजन आणि खडसे यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. पूर्वी भाजपमध्ये एकत्र असलेले हे नेते आता वेगवेगळ्या पक्षांत असून, सातत्याने एकमेकांवर टीका करत आहेत.
0 टिप्पण्या