Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Amalner Yatra : सखाराम महाराज यात्रोत्सवात उत्साही पालखी सोहळा, भजन-दिंडीने रंगला अमळनेर शहर


जळगाव न्यूज Spiritual | Culture | अमळनेर येथील श्री संत सखाराम महाराज यांच्या वार्षिक यात्रोत्सवानिमित्त सोमवारी (दि. १२ मे) पारंपरिक व भक्तिभावपूर्ण वातावरणात पालखी सोहळा उत्साहात पार पडला. खानदेशातील दोन्ही जिल्ह्यांतून आलेल्या हजारो भक्तांनी या सोहळ्यात सहभाग घेतला.

सकाळी ७ वाजता श्री सखाराम महाराजांची भरजरी पोषाख परिधान केलेली, अलंकारांनी सजवलेली आणि हातात चांदीची ढाल-तलवार घेतलेली लालजींची मूर्ती पालखीत विराजमान करण्यात आली. पालखीच्या मागे महाराजांच्या पादुका आणि मूर्ती रथातून गादिपती श्री प्रसाद महाराजांच्या मार्गदर्शनाखाली पुढे नेण्यात आल्या.

गावातील मुख्य रस्त्याने पालखीची भव्य मिरवणूक निघाली. अनेक वर्षांपासून चालत आलेल्या परंपरेप्रमाणे, महाराजांनी घरोघरी जाऊन पानसुपारीचा कार्यक्रम केला. दगडी दरवाजातून, पुलावरून, पैलाड भागात ही पालखी लेझीम पथक, ढोल-ताशा आणि भजनदिंडीच्या गजरात पुढे सरकत गेली.

यंदा मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले ते भुसावळ येथील रेल्वे बँड. त्यांचा पारंपरिक आणि सुमधुर संगीत सादरीकरणाने भाविक मंत्रमुग्ध झाले. या मिरवणुकीत मोहन महाराज बेलापूरकर यांची भजनदिंडीही विशेष लक्षवेधी ठरली.

पैलाड भागातून पालखी रात्री १०.३० वाजता श्री सखाराम महाराज समाधीस्थळी पोहोचली. तेथे गुलालाच्या भजनात भक्तांनी एकरूप होऊन प्रभू चरणी प्रार्थना केली. "सकल भारतवर्षात कोणतेही विघ्न येऊ नये, देश समृद्ध व आनंदी राहो," अशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.

शेवटी, यात्रोत्सवाचा महत्त्वपूर्ण टप्पा असलेल्या मंगळवारच्या (दि. १३) काल्याचे देवास औपचारिक निमंत्रण देण्यात आले. यात्रोत्सवाचा हा भक्तिभाव आणि सांस्कृतिक समृद्धीचा संगम अनुभवण्यासाठी दरवर्षी हजारो भाविक अमळनेर येथे एकत्र येतात.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या