Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

रावेरात डीजेच्या प्रचंड आवाजाने पोलिसांचा आकस; ध्वनी प्रदूषण प्रकरणी चालकावर गुन्हा दाखल

रावेर तालुक्यातील भोकरी येथे डीजेच्या प्रचंड आवाजामुळे पहिल्यांदाच ध्वनी प्रदूषण प्रकरणी कठोर कारवाई करत रावेर पोलिसांनी अमळनेर येथील डीजे चालकावर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई अलीकडच्या काळातील तालुक्यातील पहिलीच असून स्थानिकांमध्ये ती चर्चेचा विषय ठरत आहे.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमळनेर येथील श्री म्युझिकल बॅण्डने भोकरी गावात आयोजित कार्यक्रमात शासनाने ठरवून दिलेल्या ध्वनी मर्यादेपेक्षा जास्त आवाजात गाणी वाजवली. याची माहिती रावेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना मिळाल्यानंतर, उपनिरीक्षक मनोज महाजन आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. त्यांनी ध्वनीमापक यंत्राच्या सहाय्याने आवाजाची तीव्रता मोजली असता ती कायद्याने ठरवलेल्या मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे निष्पन्न झाले.

यामुळे डीजे वाहन आयशर (क्रमांक MH 12 NX 4560) चे चालक अजय संजय बोरसे (रा. शिरुड, ता. अमळनेर) याच्यावर ध्वनी प्रदूषण कायद्याचा भंग, पर्यावरण संरक्षण कायदा 1986 आणि ध्वनी प्रदूषण (विनियमन व नियंत्रण) अधिनियम 2000 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा अहवाल अधिकृत अधिकारी, ध्वनी मापन विभाग, जळगाव यांच्याकडे पाठवण्यात आला आहे.

पोलिसांच्या या कारवाईमुळे डीजे वाजवणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, भविष्यात नियमभंग करणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलली जातील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. पर्यावरण संरक्षणासाठी ही कारवाई आदर्श ठरावी अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या