Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

बिबट्याचा थरार! बोरखेड्यात रात्रीच्या अंधारात शेळीची शिकार, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

यावल न्यूज :  यावल तालुक्यातील बोरखेडा शिवारात ३ मे रोजी रात्री बिबट्याने शेळीची शिकार केल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. काशीनाथ राणे यांच्या शेतात वास्तव्यास असलेल्या बारेला कुटुंबास रात्री उशिरा शेळ्यांच्या किंकाळ्या ऐकू आल्यावर त्यांनी बाहेर पाहिले असता बिबट्या एका शेळीला ओढून नेत असल्याचे भयावह दृश्य दिसले. अचानक घडलेल्या या प्रकाराने घाबरलेल्या कुटुंबीयांनी त्वरित घरात आसरा घेतला.



सकाळी पाहणी केली असता, बिबट्याने एका शेळीचा फडशा पाडल्याचे स्पष्ट झाले. ही माहिती गावात पसरताच परिसरात भीतीचे आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे हिंगोणा आणि भोवतालच्या भागात याआधीही बिबट्याचे अनेक वेळा दर्शन झाले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती वाढली असून, रात्री शेतीकामे करणाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या घटली आहे.

गावकऱ्यांनी वनविभागाकडे त्वरित कारवाईची मागणी केली असून, बिबट्याच्या बंदोबस्तासाठी पिंजरे लावण्यात यावेत आणि गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे. वनविभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा एखाद्या मोठ्या दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही, असा इशाराही नागरिक देत आहेत.

बिबट्याच्या वाढत्या संख्येमुळे मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होत आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे, तसेच नागरिकांना सतर्कतेबाबत जागरूक करणे गरजेचे झाले आहे.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या