Ticker

https://www.jalgaonnews.com/feeds/posts/default?alt=rss

Ad Code

जळगाव महापालिकेचे महापौरपद OBC महिलांसाठी राखीव; भाजपमधील दोन प्रबळ दावेदार चर्चेत



जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर शहरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष महापौर पदाच्या आरक्षण सोडतीकडे लागले होते. अखेर गुरुवारी दुपारी ही उत्सुकता संपली असून, यंदाचे महापौर पद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव निघाले आहे. या निर्णयामुळे जळगावच्या राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात झाली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या जळगाव महापालिका निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवलेल्या भारतीय जनता पक्षाने ४६ पैकी ४६ जागा जिंकत ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’ केला आहे. विरोधकांचा पूर्णपणे पराभव करत भाजपने महापालिकेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. त्यामुळे महापौर पद भाजपचाच राहणार, हे जवळपास निश्चित मानले जात होते. मात्र, आरक्षण सोडतीमुळे आता पक्षाला ओबीसी महिला उमेदवार निवडण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

महापालिकेत ओबीसी महिला राखीव जागेवर निवडून आलेल्या पाच नगरसेविका सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. यामध्ये उज्वला बेंडाळे (प्रभाग १२ ब), दीपमाला काळे (प्रभाग ७ अ), विद्या सोनवणे (प्रभाग ४ ब), कविता पाटील (प्रभाग ८ अ) आणि माधुरी बारी (प्रभाग १० ब) यांचा समावेश आहे. आरक्षण जाहीर होताच या पाचही नगरसेविकांचे राजकीय महत्त्व वाढले असून, भाजपच्या गोटात महापौर पदासाठी चाचपणी सुरू झाली आहे.

विशेष म्हणजे, उज्वला बेंडाळे आणि दीपमाला काळे या दोन्ही नगरसेविका तिसऱ्यांदा बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यांचा अनुभव, संघटनात्मक कामगिरी आणि राजकीय प्रतिमा लक्षात घेता या दोघी महापौर पदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. त्यामुळे भाजपमध्ये या दोन नावांभोवतीच सध्या चर्चा अधिक रंगताना दिसत आहे.

दरम्यान, महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे गट) कडे २२ नगरसेवकांचे संख्याबळ असून, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उपमहापौर पदावर दावा स्पष्ट केला आहे. त्यामुळे महापौर भाजपचाच होणार, हे जवळपास निश्चित आहे.

आगामी काही दिवसांत भाजपकडून महापौर पदाच्या उमेदवाराची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असून, त्यानंतर जळगाव महापालिकेतील सत्तास्थापनेचे चित्र पूर्णपणे स्पष्ट होणार आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या