BHUSAWAL NEWS : रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित आणि विश्वसनीय करण्याच्या दृष्टीने मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. २४ एप्रिल रोजी भुसावळ ते खंडवा या महत्त्वाच्या मार्गावर ऑस्सिलेशन मॉनिटरिंग सिस्टम (Oscillation Monitoring System) युक्त विशेष तपासणी गाडीचे यशस्वी संचालन करण्यात आले.
या विशेष तपासणी गाडीमध्ये ‘अॅक्सिलरोमीटर’ नावाचे खास डिव्हाईस बसवले गेले आहे. हे यंत्र वेग, त्वरण आणि कंपन मोजते, जे ट्रॅकची सखोल स्थिती जाणून घेण्यासाठी अत्यावश्यक ठरते. जमा झालेला डेटा थेट संबंधित रेल पथ निरीक्षकांकडे पाठवला जातो, ज्यामुळे देखभाल अधिक अचूक आणि कार्यक्षम बनते.
मध्य रेल्वे भुसावळ विभाग दरमहा अशा प्रकारच्या तपासण्या विविध मार्गांवर करत असून, त्यामुळे रेल्वे अपघाताची शक्यता कमी होते, ट्रॅकची गुणवत्ता सुनिश्चित होते आणि प्रवास अधिक सुरक्षित व सुसह्य बनतो. प्रवाशांचा रेल्वेवरील विश्वास दृढ करण्यासाठी आणि रेल्वे सुरक्षेच्या क्षेत्रात तांत्रिक प्रगती घडवून आणण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल मानले जात आहे.
0 टिप्पण्या