पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अशोक किराणा, दत्त नगर येथे राहणाऱ्या रिजवानाबी शेख अफसर यांनी तक्रार दिली आहे की, त्यांचा मुलगा अरबाज शेख अफसर (वय १६) याला अज्ञात व्यक्तींनी फूस लावून पळवून नेले. शुक्रवार, ९ मे रोजी दुपारी तो घरातून बाहेर गेला, मात्र परतला नाही. त्याचे सर्वत्र शोध घेतल्यानंतरही तो न सापडल्याने अखेर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून, पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलीस स्टेशनमार्फत शहरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची पाहणी सुरू असून, परिसरातील नागरिक व स्थानिक दुकानदारांकडून माहिती गोळा केली जात आहे.
अपहरण झालेल्या मुलाचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे – रंग गोरा, अंगात लाल रंगाचा फुलबाह्यांचा शर्ट, निळ्या रंगाची पॅन्ट. संबंधित वर्णनाची व्यक्ती कोणाला कुठेही दिसल्यास तात्काळ एमआयडीसी पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
सदर घटना अपहरण असल्याचे प्राथमिक संशय असून, अधिक तपासानंतरच नेमके कारण स्पष्ट होईल. पोलिसांकडून सर्व शक्य त्या दिशेने तपास सुरू असून, अल्पवयीन मुलगा सुखरूप मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
0 टिप्पण्या