रावेर | प्रतिनिधी रावेर शहरात पोलिस, नगरपालिका आणि महसूल विभागाच्या संयुक्त कारवाईत अतिक्रमण हटवून अवघे चार-पाच दिवस झाले असतानाच सावदा रोडवरील बुरहानपूर जिलेबीसमोर पुन्हा रिक्षा आणि हातगाड्या उभ्या राहत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे अतिक्रमण पुन्हा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित ठिकाणी रिक्षाचालक रस्त्याच्या कडेला नव्हे तर वाहतुकीच्या मार्गात वाहन उभे करत आहेत. त्यामुळे रस्ता अरुंद होत असून वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका वाढत आहे. हळूहळू हातगाड्याही उभ्या राहत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
अतिक्रमण हटाव मोहिमेला चांगला प्रतिसाद
प्रशासनाने नुकतीच रावेर शहरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटाव मोहीम राबवली होती. पोलिस, नगरपालिका आणि महसूल विभागाच्या संयुक्त कारवाईमुळे अनेक व्यावसायिकांनी स्वतःहून टपऱ्या आणि अतिक्रमणे हटवली होती. त्यामुळे स्टेशन रोडसह अनेक प्रमुख रस्ते मोकळे झाले आणि वाहतुकीला मोठा दिलासा मिळाला.
पुन्हा अतिक्रमण होऊ नये, नागरिकांची मागणी
नागरिकांचे म्हणणे आहे की, प्रशासनाने कारवाईनंतरही सातत्याने देखरेख ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा पुन्हा रिक्षा, हातगाड्या आणि इतर अतिक्रमण वाढून पूर्वीची परिस्थिती निर्माण होऊ शकते.
यापूर्वी प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला होता की, पुन्हा अतिक्रमण केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यामुळे आता प्रशासन याकडे पुन्हा लक्ष देणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

0 टिप्पण्या