Translate

Ad Code

जळगाव: गर्भपाताला नकार दिल्याने अंध माय-लेकाला विहिरीत ढकलल्याचा आरोप; मुलाचा मृत्यू, पती व सासू ताब्यात




यावल | प्रतिनिधी  जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव येथे माणुसकीला हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. गर्भपात करण्यास नकार दिल्याच्या वादातून अंध महिला आणि तिच्या साडेतीन वर्षांच्या मुलाला विहिरीत ढकलल्याचा आरोप समोर आला आहे. या घटनेत कृष्णा पाटील (वय ३.५ वर्षे) याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून, त्याची आई सरस्वती पाटील गंभीर जखमी अवस्थेत उपचार घेत आहे.

सुरुवातीला हा अपघात असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, रुग्णालयात उपचारादरम्यान सरस्वती पाटील यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात, पती स्वप्नील पाटील आणि सासू आशाबाई पाटील यांनी विहिरीत ढकलल्याचा आरोप केला. त्यानंतर प्रकरणाला गंभीर वळण मिळाले.

पूजेच्या बहाण्याने विहिरीजवळ नेल्याचा आरोप
जखमी महिलेच्या जबाबानुसार, पूजेच्या निमित्ताने त्यांना आणि मुलाला किनगाव शिवारातील विहिरीजवळ नेण्यात आले. त्यानंतर दोघांना विहिरीत ढकलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्थानिकांच्या मदतीने दोघांना बाहेर काढण्यात आले. मात्र, कृष्णाचा मृत्यू झाला, तर सरस्वती यांच्यावर उपचार सुरू आहेत.

गर्भपाताच्या वादातून गुन्ह्याचा आरोप
प्राथमिक माहितीनुसार, सरस्वती पाटील पुन्हा गर्भवती होत्या. वैद्यकीय तपासणीनंतर होणारे बाळ दृष्टीदोषासह जन्माला येण्याची शक्यता व्यक्त झाल्याने गर्भपात करण्याचा दबाव टाकण्यात आल्याचा आरोप आहे. मात्र, सरस्वती यांनी गर्भपातास नकार दिल्याने घरात वाद सुरू होते, अशी माहिती समोर आली आहे.

पोलीस तपास सुरू
या प्रकरणी यावल पोलिसांनी स्वप्नील पाटील आणि आशाबाई पाटील यांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणातील सर्व आरोपांचा तपास सुरू असून न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होणे बाकी आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या