जिल्ह्यात माजी मंत्री गुलाबराव देवकर, सतीश पाटील आणि दोन माजी आमदारांनी नुकताच अजित पवार गटात प्रवेश केला. सुरुवातीला दिलीप वाघ यांच्या नावाचाही समावेश होता. मात्र, प्रवेश सोहळ्याला ते अनुपस्थित राहिले आणि या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.
दिलीप वाघ यांनी यापूर्वी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून दोनदा आमदारकी मिळवली होती. मात्र, दुसऱ्या वेळेस त्यांचा पराभव झाला. नंतर त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला. त्यामागे महायुतीतून उमेदवारी मिळावी ही अपेक्षा होती. पण पाचोरा विधानसभा मतदारसंघ शिंदे गटाला दिल्याने त्यांना उमेदवारी मिळाली नाही.
अपक्ष म्हणून लढूनही अपयश आल्याने आता वाघ सत्ताधारी भाजपकडे वळले आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पक्षप्रवेशाबाबत चर्चा केली होती. मात्र, त्यावेळी फडणवीसांनी काही काळ थांबण्याचा सल्ला दिला होता.
जर दिलीप वाघ भाजपात गेले, तर पाचोऱ्यात शिंदे गटाच्या नेत्यांची गोची होऊ शकते. हीच धास्ती असल्याने त्यांचा प्रवेश अद्याप रखडला आहे, असं सांगितलं जात आहे.
दिलीप वाघ यांचा भाजप प्रवेश होतो की नाही, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. मात्र त्यांनी अजित पवार गटाकडे पाठ दाखवत भाजपकडे झुकण्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे अधिकच रोचक झाली आहेत.
0 टिप्पण्या