जळगाव – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या मास्टरस्ट्रोकमुळे जळगाव जिल्ह्याचे राजकीय गणित पूर्णतः बदलले आहे. शरद पवार गटातील माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि सतीश पाटील, तसेच दोन माजी आमदार व अनेक पदाधिकाऱ्यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीची ताकद लक्षणीयरीत्या वाढली आहे.
या पक्षप्रवेशासाठी माजी मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी मध्यस्थीची भूमिका बजावल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, अंमळनेर मतदारसंघाचे आमदार अनिल पाटील व सतीश पाटील यांच्यात याआधी अनेकदा वाद झाले आहेत. मात्र आता राजकीय हितासाठी दोघांनी एकत्र येणे हे निवडणुकीच्या रणनीतीचा भाग असल्याचे विश्लेषकांचे मत आहे.
स्थानीक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका, पालिका आणि जिल्हा बँकेच्या सत्तेची समीकरणं डोळ्यासमोर ठेवून सतीश पाटील यांचा पक्षप्रवेश झाला असल्याचे दिसून येते. यामुळे अनिल पाटील यांनीही आगामी राजकीय गणित साधण्यासाठी सोज्वळ भूमिका घेतल्याचे चित्र आहे.
जळगाव ग्रामीण परिसरात अजित पवार गटाचे प्राबल्य कमी असल्यामुळे देवकर, पाटील यांच्यासारख्या दिग्गजांना सामील करून पक्ष संघटना बळकट करण्याचा प्रयत्न सुरु आहे. शिवसेनेच्या प्रभाव असलेल्या एरंडोळ, पारोळा, पाचोरा, भडगाव, चोपडा या भागांत राष्ट्रवादीचा प्रभाव वाढवणे हे यामागील मुख्य उद्दिष्ट असल्याची चर्चा रंगली आहे.
0 टिप्पण्या