BHUSAWAL NEWS | भुसावळ शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून हवामानात चढ-उतार जाणवत असून शुक्रवारी तापमानात एकाच दिवसात तब्बल ५.६ अंशांची झपाट्याने वाढ झाली. बुधवारी शहराचे कमाल तापमान ३२.२ अंश सेल्सिअस होते, तर शुक्रवारी ते थेट ३७.८ अंशांवर पोहोचले, यामुळे उकाड्यात लक्षणीय वाढ झाली आहे.
गेल्या मंगळवार आणि बुधवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे तापमानात घट झाली होती. बुधवारी तापमान ३२.७ अंशांवर होते. यावेळी आर्द्रता वाढलेली होती. मात्र, शुक्रवारी निरभ्र आकाश व उन्हाच्या तीव्रतेमुळे तापमानात प्रचंड वाढ झाली. यासोबतच हवेत गारवा निर्माण करणारी आर्द्रता देखील घटून ४५ टक्क्यांपर्यंत खाली आली, त्यामुळे उकाड्याच्या झळा अधिक जाणवत आहेत.
हवामान अभ्यासक नीलेश गोरे यांच्या मते, पुढील पाच दिवस तापमानाची हीच स्थिती कायम राहणार असून, त्यानंतर तापमान पुन्हा चाळिशीच्या वर जाण्याचा अंदाज आहे. २ मे रोजी शहराचे तापमान आधीच ४४.८ अंशांवर पोहोचले होते.
पावसाळ्यापूर्वीचा कालखंड असला तरी मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सूर्य आग ओकत असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. हवामानातील ही अनिश्चितता व सतत होणारे बदल नागरिकांच्या आरोग्यासाठीही चिंतेचा विषय ठरत आहेत. त्यामुळे हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष देत नागरिकांनी योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.
0 टिप्पण्या