या पार्श्वभूमीवर कोणतीही विलंब न करता नुकसानग्रस्त भागांमध्ये पंचनामे तात्काळ पूर्ण करावेत, अशा स्पष्ट शब्दांत आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चौंडी (अहिल्यानगर) येथे राज्य मंत्रीमंडळ बैठकीस उपस्थित असतानाच त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी फोनवरून संपर्क साधून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला.
वादळी वाऱ्यामुळे काही भागांमध्ये झाडे आणि विद्युत ताराही रस्त्यावर कोसळल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली असून, वीजपुरवठाही खंडित झाला आहे. अशा ठिकाणी तातडीने झाडे हटवून रस्ते मोकळे करावेत, वीजपुरवठा सुरळीत करावा अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
महसूल, कृषी आणि पशुसंवर्धन विभागाला यासंदर्भात तात्काळ कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, प्रशासनाकडून मदत कार्य सुरू करण्यात आले असून, नागरिकांनी अधिकाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची योग्य भरपाई मिळावी यासाठी शासन तत्पर असून, कोणताही शेतकरी व नागरिक मदतीपासून वंचित राहणार नाही, असे संकेत पालकमंत्र्यांच्या आदेशांवरून मिळत आहेत.
0 टिप्पण्या