.png)
Jalgaon News : भारतीय हवाई दलाने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाकिस्तान आणि पीओकेतील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर देशभरात सरकारच्या या निर्णयाचे समर्थन होत आहे. महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळातही या कारवाईवर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी “दहशतवाद्यांना शोधून शिक्षा करा, युद्ध नव्हे” अशी भूमिका घेतल्यानंतर चर्चांना उधाण आले आहे.
राज ठाकरे यांच्या या विधानावर जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी खोचक उपरोध केला आहे. “ते जातील ना शोधायला?” असा सवाल करत त्यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेवर निशाणा साधला. जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीदरम्यान गुलाबराव पाटील माध्यमांशी बोलत होते.
त्यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत स्पष्टपणे सांगितले की, “पंतप्रधान मोदींनी जे पाऊल उचललं आहे, त्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो. भारत हा योद्ध्यांचा देश आहे आणि देशावर हल्ला झाला तर प्रत्युत्तर देण्याची क्षमता आपल्या देशात आहे. एअर स्ट्राईक करून भारताने हे सिद्ध केलं आहे.”
राज ठाकरेंच्या विधानावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. “राज ठाकरे काय म्हणतायत, याला महत्त्व नाही. संपूर्ण भारत देशाच्या पाठीशी उभा आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपल्या कारवाईचे समर्थन होत आहे,” असे फडणवीस म्हणाले.
दरम्यान, राज ठाकरे यांनी आपल्या भूमिकेचे समर्थन करत म्हटले की, “दहशतवादी हल्ल्याचे उत्तर हे युद्ध नसते. दहशतवाद्यांना कठोर शिक्षा देणं गरजेचं आहे. त्यांच्या पुढच्या पिढ्यांना धडा मिळाला पाहिजे, अशी कारवाई व्हायला हवी.” त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चेला नवा आयाम दिला आहे.
0 टिप्पण्या