चुंचाळे : चुंचाळे गावात शुक्रवारचा दिवस भक्तिभावाने उजळून निघाला. गुरू रघुनाथबाबा आणि शिष्य वासुदेवबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित सोहळ्याला गावाने यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला, तर पारंपरिक भारुडांच्या सादरीकरणामुळे संपूर्ण वातावरणात अध्यात्माची उधळण झाली.
गुरूवार रात्रीपासूनच गावात तयारी सुरू झाली होती. गावातील महिलांनी रात्रभर जागून खापरावरील पुरणपोळ्या तयार केल्या. शुक्रवारी पहाटेपर्यंत तब्बल ५ क्विंटल पुरणपोळ्या आणि ११ क्विंटल आंब्याचा रस तयार झाला. सकाळी झालेल्या महापूजेनंतर महाआरती, आणि त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. जवळपास ४ हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
सुमारे ४ किमी अंतरावरील चुंचाळे फाट्यापासून मंदिरापर्यंत संस्थानने मोफत वाहनांची व्यवस्था केली, ज्यामुळे बाहेरून आलेल्या भाविकांना मोठा दिलासा मिळाला. या सुविधा दिवसभर सुरु होत्या.
गुजरातमधील नवसारी येथील दत्त महाराज आणि चुंचाळ्याचे नागराज महाराज यांच्या हस्ते महापूजा पार पडली. रघुनाथबाबा यांची जन्मभूमी आणि वासुदेवबाबांची कर्मभूमी म्हणून ओळख असलेल्या या पवित्र स्थळी दरवर्षी हजारो भाविक गर्दी करतात. यंदाचा पुण्यतिथी सोहळा विशेष ठरला, कारण यात्रेचा उत्साह, ग्रामस्थांचा सहभाग आणि भक्तीमय वातावरण यांनी संपूर्ण गाव जागवले.
0 टिप्पण्या