जळगाव, दि. ४ मे: जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातल्या वाक गावात मध्यरात्री घडलेल्या रक्तरंजित घटनेने खळबळ उडवली आहे. चार अज्ञात हल्लेखोरांनी तलवारीने तिघांवर जीवघेणा हल्ला करत परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण केलं आहे.
ही घटना रविवारी रात्री उशिरा घडली असून, राकेश पाटील हे आपल्या घरासमोर उभे असताना इंडिका व्हिस्टा कारमधून आलेल्या आरोपींपैकी योगेश नावाच्या इसमाने त्यांना गाडीने धडक दिली. त्यानंतर आरोपींनी कारमधून उतरून राकेश पाटील यांच्या मानेवर आणि मनगटावर तलवारीने वार केला.
यावेळी आरोपींनी “यांना सोडू नका, कापून टाका!” अशी चिथावणी दिली आणि राकेश पाटील यांचे वडील व काका यांच्यावरही तलवारीने वार केले. हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेमुळे संपूर्ण वाक गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस तपास सुरू आहे. हल्लेखोर फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके सक्रिय आहेत. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, दुश्मनी की आधीची वैयक्तिक कुरबुर याकडे पोलिसांचा झुकाव आहे.
घटनेनंतर स्थानिकांनी पोलिसांना तात्काळ माहिती दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा लवकरात लवकर तपास लागावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
0 टिप्पण्या