नवी दिल्ली – पहलगाममध्ये घडलेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याचा जोरदार बदला घेत भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये थेट घुसून कारवाई केली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताने बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास ९ दहशतवादी ठिकाणांवर अचूक हल्ले करून त्यांना जमिनदोस्त केले. या कारवाईने पाकिस्तानसह दहशतवाद्यांच्या गोटात खळबळ माजली आहे.
या ऑपरेशनमध्ये कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळाला लक्ष्य करण्यात आले नसून केवळ दहशतवादी तळांवरच टार्गेटेड स्ट्राईक करण्यात आले आहेत. या कारवाईत भारताने आंतरराष्ट्रीय कायद्याच्या चौकटीत राहून पावलं उचलली आहेत. सामान्य नागरिकांना कोणताही धोका पोहोचवला नाही, याची विशेष खबरदारी घेतली गेली.
पहलगाम हल्ल्यात २५ भारतीय आणि एक नेपाळी नागरिक शहीद झाले होते. विशेषतः या हल्ल्यात महिलांना जिवंत सोडून त्यांच्या नवऱ्यांना निर्दयीपणे गोळ्या घालण्यात आल्या होत्या. त्यांच्या कपाळावरील सिंदूर पुसण्याचा हा भ्याड प्रयत्न होता. यालाच प्रत्युत्तर म्हणून भारताने या ऑपरेशनला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव दिले आहे. हे मिशन महिलांच्या अस्मितेचे प्रतीक ठरले आहे.
ही कारवाई केवळ दहशतवाद्यांच्या विरोधात असून, पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाविरोधात नसल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. मात्र, या कारवाईनंतर पाकिस्तानमध्ये दहशतवादी अड्डे रिकामे करण्यात आले असून, सीमेवर हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे.
२०१६ मधील सर्जिकल स्ट्राईक, २०१८ मधील बालाकोट एअर स्ट्राईकनंतर भारताची ही तिसरी निर्णायक कारवाई आहे. यामार्फत भारताने पुन्हा एकदा दाखवून दिलं की, दहशतवाद्यांना केवळ इशारे नाही तर थेट प्रत्युत्तर दिलं जाईल – तेही त्यांच्या घरात घुसून!
0 टिप्पण्या