Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

BHUSAWAL NEWS : भुसावळ बसस्थानकाच्या रखडलेल्या डांबरीकरणास गती; पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होणार – विभागीय नियंत्रकांची माहिती

BHUSAWAL NEWS : भुसावळ येथील बसस्थानकाच्या रखडलेल्या डांबरीकरण व खडीकरणाच्या कामास अखेर गती मिळाली असून, येत्या काही दिवसांत काम सुरू होणार आहे. पावसाळ्यापूर्वी संपूर्ण डांबरीकरण पूर्ण करण्याचा मानस असल्याची माहिती विभागीय एसटी नियंत्रक बी. एस. जगनोर यांनी दिली आहे.


भुसावळ हे महत्त्वाचे आगार असून येथे दररोज राज्यभरातून अनेक बसेस ये-जा करतात. मात्र, बसस्थानकाच्या आवारात डांबरीकरण न झाल्यामुळे जागा अत्यंत ओबडधोबड झाली आहे. या भागातून बस जाताना चाकाखालून उडणारे लहान दगड प्रवाशांना लागून अपघात होत आहेत. नुकत्याच एका घटनेत, एका प्रवाशाच्या पायाला दगड लागून तो जायबंदी झाला.

या समस्येकडे वारंवार लक्ष वेधूनही काम रखडले होते. मात्र आता विभागीय पातळीवर गांभीर्याने लक्ष देत बसस्थानकाच्या आवारात लवकरच खडीकरण आणि डांबरीकरण सुरू करण्यात येणार आहे.

या कामामुळे पावसाळ्यात पाणी साचण्याचा प्रश्न मिटणार असून, प्रवाशांना मिळणारा त्रास कमी होणार आहे. तसेच, बसस्थानकाची एकूणच अवस्था सुधारल्यामुळे प्रवाशांचा अनुभव अधिक सुखकर होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

एसटी महामंडळाने घेतलेल्या या निर्णयामुळे नागरिकांत समाधान व्यक्त होत असून, यामुळे सार्वजनिक वाहतूक सेवेत सुरक्षितता व सुविधा वाढण्यास मदत होणार आहे. स्थानिकांनी काम वेळेत आणि दर्जेदार व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या