मुक्ताईनगर | प्रतिनिधी आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त मुक्ताईनगरातील संत मुक्ताबाई मंदिर परिसरात वारकरी परंपरा आणि आधुनिक डिजिटल सुरक्षिततेचा अनोखा संगम पाहायला मिळाला. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील स्कूल ऑफ कॉम्प्युटर सायन्सच्या Quick Heal Cyber Warrior Club तर्फे, Quick Heal Foundation आणि महाराष्ट्र सायबर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर जनजागृतीचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमातून 500 हून अधिक वारकरी आणि भाविकांपर्यंत सायबर सुरक्षेचा महत्त्वपूर्ण संदेश पोहोचविण्यात आला.
या उपक्रमात स्कूल ऑफ कॉम्प्युटर सायन्सच्या 20 सायबर वॉरियर्सनी उत्साहाने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा परिधान केली होती. एका विद्यार्थ्याने भगवान श्री विठ्ठल तर एका विद्यार्थिनीने माता रुक्मिणी यांची वेशभूषा साकारून वारकरी संप्रदायाचे आकर्षक दर्शन घडविले. "सायबर वारकरी" या अभिनव संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षेचे संदेश देणारे फलक, पोस्टर्स आणि विशेष कॅप्सच्या माध्यमातून जनजागृती केली.
आषाढी एकादशी निमित्त मंदिरात आलेल्या तीन वेगवेगळ्या पालख्यांसमोर विद्यार्थ्यांनी प्रभावी पथनाट्य आणि नृत्य सादर केले. या सादरीकरणातून ऑनलाइन फसवणूक, बनावट लिंक, ओटीपी फसवणूक, बँकिंग व यूपीआय फसवणूक, सोशल मीडियाचा गैरवापर आणि डिजिटल व्यवहार करताना घ्यावयाची काळजी याबाबत प्रभावी संदेश देण्यात आला. मनोरंजनातून प्रबोधन हा उद्देश ठेवून सादर करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला वारकरी आणि भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन संवाद साधत मोबाईलचा सुरक्षित वापर, ओटीपी, पासवर्ड किंवा बँक खात्याची माहिती कोणालाही न देणे, संशयास्पद लिंकवर क्लिक टाळणे आणि ऑनलाइन फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक खबरदारी याबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. उपस्थितांच्या शंकांचे समाधान करत डिजिटल सुरक्षिततेचे महत्त्वही त्यांनी पटवून दिले.
यावेळी वारकरी आणि भाविकांना 'सायबर सेफ कार्ड्स' चे वाटप करण्यात आले. या कार्ड्समध्ये सायबर सुरक्षेसंदर्भातील महत्त्वाच्या सूचना, खबरदारीचे उपाय आणि आपत्कालीन संपर्काची माहिती देण्यात आली होती. अनेक भाविकांनी ही माहिती जतन करून ठेवत विद्यार्थ्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.
सायबर सुरक्षेची जनजागृती अधिक प्रभावी व्हावी यासाठी प्रश्नमंजुषा, छोटेखानी खेळ, संवादात्मक उपक्रम आणि प्रत्यक्ष सहभागावर आधारित विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. त्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.
या अभिनव उपक्रमामुळे परंपरा, संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सुंदर संगम घडला. युवकांनी सामाजिक बांधिलकी जपत नाविन्यपूर्ण पद्धतीने सायबर जनजागृती करण्याचा आदर्श घालून दिला. भविष्यातही अशाच सर्जनशील उपक्रमांच्या माध्यमातून समाजामध्ये सायबर सुरक्षेबाबत व्यापक जनजागृती करण्याचा निर्धार Quick Heal Cyber Warrior Club च्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.

0 टिप्पण्या