मंत्रालयात नोकरीचे आमिष; बोगस वकील आणि 'महान्याय दंडाधिकारी' अटकेत, जळगाव कनेक्शन उघड
जळगाव | प्रतिनिधी
जळगावसह राज्यातील बेरोजगार तरुणांना मंत्रालयात सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटच्या तपासात महत्त्वाची प्रगती झाली आहे. या प्रकरणात स्वतःला मंत्रालयातील महिला व बालविकास विभागाचा कायदे विषयक सल्लागार आणि महान्याय दंडाधिकारी म्हणून भासवणाऱ्या दोन संशयितांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे गोविंद दीपक स्वार (रा. बदलापूर) आणि संदेश बी. शिरसाठ (रा. कल्याण, ठाणे) अशी आहेत. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, गोविंद स्वार हा स्वतःला महिला व बालविकास विभागाचा कायदे विषयक सल्लागार व समिती सदस्य असल्याचे सांगत होता, तर संदेश शिरसाठ हा स्वतःला महान्याय दंडाधिकारी असल्याचा बनाव करत असल्याचा आरोप आहे.
न्यायालयात हजर; पोलिस कोठडी
दोन्ही संशयितांना बुधवारी एमआयडीसी पोलिसांनी न्यायालयात हजर केले. चौकशीसाठी पोलिसांनी कोठडीची मागणी केली. सुनावणीदरम्यान संशयितांनी स्वतःची ओळख ज्या प्रकारे सांगितली, त्याची गंभीर दखल न्यायालयाने घेतल्याचे समोर आले.
या प्रकरणाचा तपास व्यापक स्वरूपाचा असल्याने न्यायालयाने संशयितांना पोलिस कोठडी सुनावली असून, तपास यंत्रणांना आवश्यक ती चौकशी करण्याचे निर्देश दिले.
जळगावातील भरती फसवणूक प्रकरणाशी संबंध
या प्रकरणाचा तपास करताना जळगावातील भरती फसवणुकीच्या गुन्ह्याशी या रॅकेटचा संबंध समोर आला आहे. सरकारी नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली अनेक बेरोजगारांकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप असून, या रॅकेटमध्ये आणखी काही जणांचा सहभाग आहे का, याचाही शोध पोलिस घेत आहेत.
तपास सुरू
पोलिस सध्या संशयितांचे आर्थिक व्यवहार, मोबाईल डेटा, कागदपत्रे आणि इतर पुराव्यांची तपासणी करत आहेत. या प्रकरणात आणखी अटक होण्याची शक्यता पोलिस सूत्रांनी व्यक्त केली आहे.

0 टिप्पण्या