भुसावळ | प्रतिनिधी भुसावळ तालुक्यात चालत्या एसटी बसमध्ये धक्कादायक चोरीची घटना उघडकीस आली आहे. जामनेर ते कुऱ्हा मार्गावरील बसमध्ये प्रवास करणाऱ्या ७१ वर्षीय वृद्धाच्या पॅन्टच्या चोर खिशातून तब्बल ९ तोळे सोन्याचे दागिने, अंदाजे ३.६० लाख रुपये किमतीचे, अज्ञात चोरट्याने लंपास केले.
माहितीनुसार, शेंगोळा (ता. जामनेर) येथील रहिवासी कांतीलाल मोतीलाल चोपडा (वय ७१) हे ३ जुलै २०२६ रोजी जामनेर-कुऱ्हा एसटी बसने प्रवास करत होते. सकाळी ११.२० ते ११.४५ दरम्यान लोहारा ते भुसावळ प्रवासादरम्यान त्यांनी पॅन्टच्या चोर खिशात एका पाऊचमध्ये ९ तोळे सोन्याचे दागिने ठेवले होते.
बसमधील गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने अत्यंत चलाखीने त्यांच्या खिशातील दागिन्यांचे पाऊच चोरून नेले. भुसावळ येथे बसमधून उतरल्यावर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला.
भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा
फिर्यादी यांच्या तक्रारीवरून ४ जुलै २०२६ रोजी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा रजि. नं. १३०/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३०५(क) अंतर्गत चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पीएसआय संजय कंखरे यांच्याकडे तपास
या प्रकरणाची नोंद 'ई-साक्ष' प्रणालीद्वारे करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय कंखरे पुढील तपास करत आहेत.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, एसटी किंवा इतर सार्वजनिक वाहतुकीत प्रवास करताना मौल्यवान दागिने, रोकड व कागदपत्रे सुरक्षित ठेवावीत आणि संशयास्पद व्यक्तींवर लक्ष ठेवावे.

0 टिप्पण्या