राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्याशी संबंधित सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटो प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून बनावट फोटो तयार करण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाने स्पष्ट केले असून हे फोटो खोटे असल्याचेही सांगण्यात आले आहे.
या प्रकरणावर गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर खुलासा केला. “माझ्याशी संबंधित फोटो एआयच्या माध्यमातून तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत,” असे त्यांनी म्हटले. संबंधित मुलगी ही त्यांच्या दिवंगत मित्राची मुलगी असून तिच्या लग्नाची जबाबदारी माझ्यावर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महाजन यांनी सांगितले की, काही फोटो सेल्फी स्वरूपात आणि काही क्रॉप करून चुकीच्या पद्धतीने व्हायरल करण्यात आले आहेत. “माझे कुटुंबीय आणि संबंधित मुलगी यांचे कौटुंबिक संबंध आहेत, मात्र याचा गैरवापर करून बदनामी केली जात आहे,” असा आरोप त्यांनी केला.
या संपूर्ण प्रकरणात सायबर सेलमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून मुख्यमंत्री आणि पोलिस प्रशासनाला याबाबत माहिती देण्यात आली आहे. “ही अत्यंत गंभीर बाब असून यामागे कोण आहे याचा तपास सुरू आहे,” असे महाजन यांनी सांगितले.
याचबरोबर बदनामी करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करत उच्च न्यायालयात जाणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. “फोटो व्हायरल करणाऱ्यांची यादी तयार असून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
👉 या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू असून सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

0 टिप्पण्या