जळगाव | संस्कृत भाषेच्या प्रचार व प्रसारासाठी कार्यरत असलेल्या संस्कृत भारती या संस्थेतर्फे १७ मे रोजी जळगाव येथे एक विशेष संस्कृत परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेचे आयोजन संस्कृत भारती देवगिरी प्रांत, जळगाव जिल्हा संस्था चालक संघटना, तसेच डॉ. केतकी पाटील यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे.
ही परिषद जळगावातील गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक येथे सकाळी १० वाजता सुरू होईल. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, शाळा व महाविद्यालयांचे प्रतिनिधी तसेच संस्कृतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
या परिषदेचा प्रमुख उद्देश म्हणजे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (NEP 2020) विद्यार्थ्यांना संस्कृतसारख्या भारतीय भाषांचा अभ्यास करण्यासाठी कशा प्रकारे संधी उपलब्ध करून देता येईल, यावर चर्चा करणे.
परिषदेत पुढील मुद्यांवर सखोल विचारविनिमय होणार आहे:
-
शाळा व महाविद्यालयांमध्ये संस्कृत विषयाची उपलब्धता
-
विषय निवड प्रक्रियेत संस्कृतसाठी प्रोत्साहन
-
संस्कृत शिकवताना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय
-
संस्कृत शिक्षकांची उपलब्धता व प्रशिक्षण
या परिषदेचे विशेष आकर्षण म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या प्रशासन सेवेत कार्यरत व संस्कृत लेखिका असलेल्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांचे मार्गदर्शन. त्या शासकीय सेवेतील वर्ग-१ अधिकारी असून, त्यांनी संस्कृत विषयावर अनेक लेखन व सादरीकरणे केली आहेत.
परिषदेत सहभागी होण्यासाठी विविध शाळा, महाविद्यालयांना निमंत्रण पाठवण्यात आले असून, संस्कृतप्रेमी नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
0 टिप्पण्या