Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

JAMNER NEWS मोजणी न झाल्याने शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांनी रोखले

JAMNER JALGAON NEWS : खर्चाणे ता. जामनेर येथील शेतकरी बाबुराव बंडू पाटील यांनी त्यांच्या शेतजमिनीची मोजणी न झाल्याने नाराजीच्या भरात महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान भूमी अभिलेख कार्यालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी ८ वाजता घडली.


बाबुराव पाटील यांच्यानुसार, गेल्या दोन महिन्यांपासून ते भूमी अभिलेख कार्यालयात वेळोवेळी अर्ज करत आहेत. जामनेर येथील कार्यालयात प्रत्यक्ष जाऊनही त्यांनी आपली व्यथा मांडली, परंतु संबंधित अधिकारी त्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष करत असून, मोजणी टाळण्याचा प्रयत्न करत आहेत.

या उद्वेगाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दिनी झेंडावंदन सुरु असताना बाबुराव पाटील यांनी कार्यालयाबाहेर स्वतःवर ज्वलनशील द्रव ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने घटनास्थळी उपस्थित पोलिस कर्मचाऱ्याने प्रसंगावधान राखून त्यांना तत्काळ रोखले आणि मोठा अनर्थ टळला.

या घटनेमुळे शासकीय कार्यालयांच्या कामकाजाविषयी स्थानिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात, अशी मागणी होत आहे.

संबंधित घटनेनंतर स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी तपास सुरू केला असून, बाबुराव पाटील यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे. दरम्यान, कृषी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढील कार्यवाहीसाठी तत्परतेने लक्ष देण्याचे संकेत दिले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या