गुरुवारी रात्री उशिरा पंजाबमधील पठाणकोटमध्ये पाकिस्तानकडून ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून मोठ्या प्रमाणात हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये पठाणकोट एअरबेससह जालंधर परिसराला लक्ष्य करण्यात आलं होतं. मात्र भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने जबरदस्त प्रत्युत्तर देत या सर्व हल्ल्यांना आकाशातच निष्प्रभ केलं. सुदैवाने या हल्ल्यांमध्ये कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचं नुकसान झाल्याचं वृत्त नाही.
हल्ल्यानंतर भटिंडा, जालंधर आणि चंदीगडमध्ये ड्रोन हल्ल्याचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने पंजाबमधील सर्व शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे पुढील तीन दिवसांसाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले गेले आहेत. विशेषतः अमृतसर, गुरुदासपूर, पठाणकोट, फाजिल्का, फिरोजपूर, तरनतारन आणि लुधियाना या ७ जिल्ह्यांमध्ये शिक्षण संस्थांना तात्काळ बंद ठेवण्यास सांगण्यात आलं आहे. अमृतसरमध्ये ९ ते ११ मे या कालावधीत शाळा बंद राहतील, तर गुरुदासपूरमध्ये पुढील आदेश येईपर्यंत शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत.
या हल्ल्यांमुळे पंजाब आणि हरियाणा राज्यात उच्च सतर्कता जारी करण्यात आली आहे. हरियाणातील अनेक भागांत ब्लॅकआउट घोषित करण्यात आलं असून चंदीगड, पंचकुला, मोहाली याठिकाणीही रात्रीच्या वेळी दिवे बंद ठेवण्याचे आदेश आहेत.
दरम्यान, पाकिस्ताननेही आपल्या सीमेवर लष्करी हालचाली वाढविल्या असून पंजाब आणि राजस्थानच्या सीमेवर F-16 आणि JF-17 सारखी आधुनिक विमाने तैनात करण्यात आली आहेत. लाहोरच्या आकाशातही या विमानांचे उड्डाण सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
संपूर्ण परिस्थितीचा विचार करता, पंजाब पोलिसांच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रजा ७ मेपासून पुढील आदेश येईपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. केवळ अत्यावश्यक परिस्थितीतच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने रजा मंजूर केली जाईल.
या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा आणि प्रशासन अलर्टवर आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत मार्गदर्शनानुसारच वागावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.
0 टिप्पण्या