यावल – पैशांनी माणूस विकत घेता येतो, असं सर्रास म्हटलं जातं. मात्र, अंजाळे येथील रिक्षा चालक राकेश भास्कर सपकाळे यांनी आपल्या प्रामाणिक वर्तनातून या म्हणीला छेद देत समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. त्यांच्या रिक्षामध्ये विसरलेली ७० हजार रुपयांची पिशवी त्यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता मूळ मालकाला परत केली.
ही घटना अंजाळे गावात घडली. चिंतामण महाराज या गावातील महाराजांनी अलीकडेच राकेश सपकाळे यांच्या रिक्षाने प्रवास केला. भुसावळकडे जाताना ते चुकून आपली पिशवी रिक्षामध्ये विसरून गेले. पिशवीत तब्बल ७० हजार रुपये होते. काही वेळाने पिशवी हरवली असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी जगन्नाथ महाराज मंदिराचे गादीपती धनराज महाराज यांच्याशी संपर्क साधला.
धनराज महाराज यांनी लगेच रिक्षाचालक राकेश सपकाळे यांना फोन केला असता, राकेश यांनी अत्यंत प्रामाणिकपणे सांगितले की पिशवी त्यांच्या रिक्षात आहे. त्यानंतर त्यांनी ती पिशवी मूळ मालकाच्या ताब्यात दिली.
या प्रसंगानंतर गावात राकेश यांच्या प्रामाणिकतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. इतक्या मोठ्या रकमेची पिशवी परत करणं ही आजच्या काळात दुर्मिळ बाब मानली जाते. राकेश यांचा हा उदात्त निर्णय हा इतरांसाठी प्रेरणादायक आहे आणि त्यांनी समाजात माणुसकी जिवंत असल्याचं दाखवून दिलं आहे.
0 टिप्पण्या