महाबळेश्वरमध्ये आयोजित महापर्यटन महोत्सव 2025 च्या समारोप सोहळ्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या खास शैलीत भाषण करत विरोधकांना टोला लगावला आणि पर्यटनाबाबत सकारात्मक दृष्टीकोन व्यक्त केला.
"शिंदे म्हणतात महाबळेश्वरला आले की तापमान कमी होतं, पण मी गावाला आलो की इकडे तापमान कमी होतं आणि मुंबईत वाढतं," अशा शब्दांत त्यांनी मिश्कील शैलीत विरोधकांवर टीका केली. ते पुढे म्हणाले की, "विरोधक यावरून बातम्या करतात, पण मी याचा आनंद घेतो. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी मी इथे येतो."
शिंदे यांनी सांगितले की सरकारची भूमिका स्थानिकांना इथेच रोजगार मिळावा, यासाठी स्पष्ट आहे. महोत्सवामुळे पर्यटनाला चालना मिळेल आणि स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळेल. "मी कालपासून अनेक स्टॉल्सना भेट दिली आहे आणि वेगवेगळ्या भागांची चव अनुभवली आहे. सरकार कुणाच्या मागे उभं राहिलं की काय घडतं, याचे उदाहरण म्हणजे हे यशस्वी आयोजन," असेही त्यांनी नमूद केले.
महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरी उत्पादनाचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की इथं देशातील 80 टक्के स्ट्रॉबेरी उत्पादन होते. त्यांनी बांबू लागवड, गट शेती आणि कमी खर्चात जास्त उत्पादन यावर भर देण्याची गरज सांगितली.
"मी वेळ काढून गावाला येतो आणि 2000 झाडं लावतो. बांबू कुठे लावायचा हे मुख्यमंत्र्यांना माहीत आहे. लंडनपेक्षा महाबळेश्वर बरे, त्यांच्या कुशीत वसले माझं गाव दरे," अशा भावनिक शब्दांत त्यांनी आपली निसर्गप्रेमी भूमिका व्यक्त केली.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. शिंदे यांनी स्पष्ट केले की ब्रिटिशांनंतर महाबळेश्वर हे पर्यटन स्थळ विकसित करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे आणि हे सरकार ती पार पाडणार आहे.
0 टिप्पण्या