जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात दुर्घटनेचा दुसरा मोठा प्रकार समोर आला आहे. लग्न आटोपून फर्दापूरकडे परतणाऱ्या वऱ्हाडांच्या क्रुझर गाडीला झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी १० मे रोजी दुपारी ४.३० वाजता जामनेर-जळगाव रोडवरील रोहिणी हॉटेलजवळ घडली.
मृत व्यक्तीचे नाव दशरथ रतन चव्हाण (वय ५५, रा. फर्दापूर, ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजी नगर) असे आहे. पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टाकळी (ता. जामनेर) येथे लग्न समारंभासाठी आलेले वऱ्हाडीयांनी कार्यक्रम आटोपल्यानंतर क्रुझर वाहनाने फर्दापूरकडे प्रयाण केले. मात्र, चालकाचा ताबा सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला उलटले.
अपघातात दशरथ चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला, तर लखिचंद शंकर चव्हाण (५०), मोहनदास शंकर जाधव (५०), विक्रम मोतीलाल चव्हाण (२५), बाबू पांचु जाधव (७५), उखा दलू राठोड (६५), धिरलाल सदू राठोड (६५), हिरा महारू चव्हाण (५८), प्रतीक प्रवीण राठोड (७), भिवसिंग मनूर चव्हाण (७५) हे गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातानंतर बोदवडच्या रुग्णवाहिका चालक मनोज तेली, शेदुर्णी येथील चालक सुनील लोखंडे, डॉ. मुख्तार पटेल व डॉ. अनिकेत सोनवणे यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेऊन जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.
पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
0 टिप्पण्या