जळगाव :- जिल्हा रुग्णालय अर्थात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC) मध्ये रुग्णांसाठी अत्याधुनिक एमआरआय व अँजिओग्राफी तपासणी सेवा शनिवारपासून उपलब्ध होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात GMC मध्ये दाखल झालेल्या ‘श्री टी एमआरआय मशीन’ या अत्याधुनिक उपकरणाचे ३ मे रोजी सकाळी १०.३० वाजता लोकार्पण होणार असून, तत्काळ रुग्णांसाठी ही सेवा सुरु होणार आहे.
जळगाव GMCमध्ये एमआरआय आणि अँजिओग्राफी सुविधा रुग्णांसाठी खुली |
लोकार्पण सोहळ्याला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन अध्यक्षस्थानी असून, कार्यक्रमाचे मुख्य उद्घाटक मंत्री गुलाबराव पाटील असतील. यावेळी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आणि विविध राजकीय पदाधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत.
या यंत्राच्या स्थापनेसाठी मागील दीड महिन्यांपासून इन्स्टॉलेशनचे काम सुरू होते, जे आता पूर्ण झाले आहे. GMCमध्ये यापूर्वी एमआरआय सुविधा नसल्याने अनेक गरीब रुग्णांना खासगी रुग्णालयात ५ ते २० हजार रुपयांपर्यंत खर्च करून तपासणी करावी लागत होती. आता हीच सेवा GMCमध्ये फक्त २ हजार ते ५ हजार रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे.
या सुविधेअंतर्गत एमआरआयसह अँजिओग्राफीसारख्या महत्त्वाच्या तपासण्या करता येणार आहेत. अत्यावश्यक रुग्णांसाठी २४ तास सेवा उपलब्ध असेल, तर इतर रुग्णांसाठी सोमवार ते शनिवार सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत ही सेवा ओपीडी वेळेत दिली जाणार आहे.
यासाठी GMCतर्फे एक रेडिओलॉजिस्ट, तीन पीजी विद्यार्थी आणि दोन प्रशिक्षित टेक्निशियन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे तपासणी केल्यानंतर योग्य निदान आणि सल्लाही तज्ञांकडून रुग्णांना दिला जाणार आहे.
या नव्या सुविधा ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील रुग्णांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. GMCचा हा उपक्रम जिल्ह्यातील आरोग्य सेवा बळकट करण्यात मोलाचा वाटा उचलणारा ठरणार आहे.
0 टिप्पण्या