GIRISH MAHAJAN VS AJIT PAWAR जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीतील प्रोटोकॉल मोडल्याचा गंभीर आरोप भाजप नेते व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात लढलेले जळगाव व धुळे जिल्ह्यातील ५ माजी आमदारांना अजित पवारांनी पक्षात प्रवेश दिला. या पार्श्वभूमीवर महाजन यांनी नाराजी व्यक्त करत थेट हल्लाबोल केला आहे.
महाजन म्हणाले, “महाविकास आघाडीतून कोणी महायुतीमध्ये यायचं असेल, तर त्या त्या जिल्ह्यातील मित्रपक्षांच्या नेत्यांशी चर्चा करूनच निर्णय घेण्याचे ठरले होते. फडणवीस, शिंदे व अजित पवार यांच्यात दोन महिन्यांपूर्वी याबाबत सहमती झाली होती. मात्र, अजित पवारांनी हा शिष्टाचार मोडून एकतर्फी प्रवेश दिला.”
महाजन यांनी स्पष्ट केले की, संबंधित माजी आमदार भाजपमध्ये यायला इच्छुक होते. पण जळगावचे पालकमंत्री व शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी त्यांचा विरोध केल्यामुळे त्यांना भाजपमध्ये घेतले गेले नाही. “आम्ही कुणालाही पक्षात घेण्यापूर्वी त्यांचा राजकीय इतिहास आणि आर्थिक पार्श्वभूमी तपासतो. अजित पवारांनीही तेच करायला हवे होते,” असेही त्यांनी नमूद केले.
या प्रवेशामुळे महायुतीतील समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, गिरीश महाजन यांनी लवकरच अजित पवारांशी चर्चा करण्याचे संकेत दिले आहेत. तथापि, महाजन यांनी हेही स्पष्ट केले की, आता आम्हालाही कोणालाही पक्षात घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. “भाजपमध्ये अनेक जिल्ह्यांत इनकमिंग वाढत आहे. आता आम्हीही त्यांना पक्षात घेऊ, तेव्हा अजित पवारांनी हरकत घेऊ नये,” असा इशाराही त्यांनी दिला.
0 टिप्पण्या