जिल्हा नियोजन समिती योजनांअंतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विभागांचा गौरव सोहळा संपन्न
जळगाव : “कागदावर सही होणं हे केवळ तंत्र आहे, पण तीच सही जर सेवाभावाने केली गेली, तर ती एखाद्याच्या जीवनात बदल घडवू शकते. लोकांचा विश्वास हेच आपल्या कामाचं खरे प्रमाणपत्र आहे,” असे शब्द पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा नियोजन योजनांअंतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विभागांच्या गौरव सोहळ्यात बोलताना व्यक्त केले.
या सोहळ्यात जिल्ह्यातील १२ विभागांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी सन्मानित करण्यात आले. याआधी महसूल विभागाचा सन्मान करण्यात आला होता. पालकमंत्र्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना संबोधित करताना सांगितले की, “आपल्याकडे आलेला माणूस आपलाच आहे, या भावनेने निर्णय घ्या. त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य उमलवण्याचा प्रयत्न करा.”
कार्यक्रमाला खासदार सौ. स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे, जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
राज्यस्तरावरील यश:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या '१०० कृती आराखडा' उपक्रमात जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक हे दोघेही राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आले. याबद्दल पालकमंत्र्यांनी त्यांचे विशेष कौतुक केले.
गौरवप्राप्त विभाग व अधिकारी:
सत्कारप्राप्त विभागांमध्ये पोलीस विभाग, महिला व बाल विकास, जिल्हा उद्योग केंद्र, आदिवासी विकास, महावितरण, सार्वजनिक बांधकाम, जळगाव वनविभाग यांचा समावेश होता. याशिवाय 'सुंदर माझी शाळा' आणि डिजीटल क्लासरूमसारख्या अभियानांतर्गतही उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शिक्षक व शाळांचाही सन्मान करण्यात आला.
उद्योग क्षेत्रात गौरव:
‘जिल्हा उद्योग पुरस्कार’ मे. आदिनाथ अँग्रो इंडस्ट्रीज, पारोळा यांना प्रदान करण्यात आला. १०० लोकांना रोजगार व २४ कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या या संस्थेचे मालक श्री. चकोर दिलीप जैन यांनी ऑरगॅनिक फर्टीलायझरच्या उत्पादनात मोठे यश मिळवले आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडाकेबाज कामगिरी:
जळगाव विभागाने ४३७ गुन्हे नोंदवून १.६० कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. एमआयडीसीमध्ये बनावट मद्यनिर्मिती प्रकरणात ७५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला गेला आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे यांनी केले. त्यांनी २०२४-२५ मधील विभागीय कामाचा सविस्तर आढावा दिला. हा गौरव सोहळा इतर विभागांसाठीही प्रेरणादायी ठरला.
0 टिप्पण्या