![]() |
मुख्यमंत्री वयोश्री योजनेत लाभार्थ्यांसाठी अनुदानाची संधी; तातडीने कागदपत्रे सादर करा! |
जळगाव - राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत ६५ वर्षांवरील वयोवृद्ध नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील अनेक लाभार्थ्यांना सहाय्य साधने व उपकरणांसाठी अनुदान मंजूर झाले आहे. मात्र, काही लाभार्थ्यांच्या आधार कार्ड व बँक खात्यांमधील किरकोळ तफावत असल्याने त्यांना अनुदान प्राप्त होण्यात अडथळे निर्माण झाले आहेत.
या संदर्भात समाजकल्याण विभागाने लाभार्थ्यांसाठी सुलभ प्रक्रिया राबवून कागदपत्रे सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. संबंधित लाभार्थ्यांची यादी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आली असून, ही यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर (jalgaon.gov.in) समाजकल्याण विभागाच्या पेजवर पाहायला मिळेल.
लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड व राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकची झेरॉक्स प्रत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात किंवा समाजकल्याण विभागाच्या व्हॉट्सॲप क्रमांक ९४२३१८४७६७ वर लवकरात लवकर सादर करावीत, असे आवाहन सहायक आयुक्त योगेश प्रविणसिंग पाटील यांनी केले आहे.
ही प्रक्रिया पूर्ण केल्यास संबंधित लाभार्थ्यांना मंजूर अनुदान थेट त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल. समाजकल्याण विभाग लाभार्थ्यांना वेळेत सहाय्य पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी ही संधी गमावू नये व त्वरित आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या