जळगाव – शहरातील एक वृद्ध महिला वकिल ७५ लाख रुपयांना फसवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बनावट शेल कंपनीच्या माध्यमातून सात जणांनी संगनमत करून ही फसवणूक केल्याचा आरोप असून, शहर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे. अटकेनंतर आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले असता, सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणात ॲड. शिरीन गुलाम अली अमरेलीवाला (वय ६५, रा. शांतीबन अपार्टमेंट, गजानन कॉलनी) यांनी शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, मनीष सतीश जैन (वय ४९, रा. यश प्लाझा), अतुल सतीश जैन (वय ५०), यशोमती सतीश जैन, जाफर खान मजिद खान (रा. सुप्रीम कॉलनी), विजय इंद्रचंद ललवाणी (रा. सिंधी कॉलनी), अक्षय अग्रवाल (रा. गोलाणी) आणि केतन किशोर काबरा (रा. जयनगर) या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, वरील सात जणांनी 'भूमिरत्नम रियल इस्टेट प्रा. लि.' नावाची बनावट शेल कंपनी तयार केली होती. या कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास व्याजासह नफा मिळेल, तसेच मुंबईत फ्लॅट दिला जाईल, असे आमिष दाखवून त्यांनी शिरीन अमरेलीवाला यांच्याकडून ७५ लाख रुपये घेतले. सुरुवातीला थोडा नफा देऊन त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला, मात्र नंतर कोणताही परतावा देण्यात आला नाही.
या प्रकरणाची सखोल चौकशी आर्थिक गुन्हे शाखेने केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी १ मे रोजी रात्री मनीष जैन, अतुल जैन आणि विजय ललवाणी या तिघांना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. अन्य आरोपींचा शोध घेतला जात आहे.
शहरात अशाप्रकारच्या फसवणुकीच्या घटनांमुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
0 टिप्पण्या