JALGAON MARATHI NEWS :– जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात मानवतेला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. प्रेमाच्या आमिषाने दोन महिलांना फसवून त्यांचे विवस्त्र व्हिडिओ रेकॉर्ड करून समाजमाध्यमांवर व्हायरल करणाऱ्या नराधमाविरोधात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावात २५ एप्रिलपूर्वी श्रीकृष्ण अनिल चिखलकर या संशयिताने ३६ वर्षीय विवाहित महिलेला गोड बोलण्याने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर व्हिडिओ कॉलद्वारे तिला विवस्त्र होण्यास भाग पाडले आणि तिचा खाजगी व्हिडिओ रेकॉर्ड केला. हीच कृत्ये त्याने दुसऱ्या एका तरुणीशी देखील केली असून, तिचाही अश्लील व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला.
या अत्यंत लाजिरवाण्या प्रकारामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिलांची प्रतिमा धुळीस मिळवणाऱ्या अशा नराधमाविरोधात कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी संतप्त नागरिक करत आहेत. सामाजिक माध्यमांचा गैरवापर करून महिलांना ब्लॅकमेल करण्याचा हा प्रकार केवळ महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न नाही, तर प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो.
या घटनेची माहिती मिळताच पीडित महिलांनी मुक्ताईनगर पोलिसांत धाव घेतली असून, पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. मात्र, या प्रकरणातील आरोपीला अद्याप अटक झालेली नाही, ही बाब अधिकच संतापजनक आहे.
जिल्हा प्रशासन आणि पोलीस खात्याला आता जागं होऊन त्वरित अटक, फास्ट ट्रॅक चौकशी आणि आरोपीस कठोर शिक्षा द्यावी लागेल, अन्यथा जनतेचा रोष रस्त्यावर उतरणार हे निश्चित!
0 टिप्पण्या