जामनेर तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी विशेष गहन पुनरिक्षण (SIR) अर्थात मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहिमेच्या कामामुळे अध्यापनावर परिणाम होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत तहसीलदारांना निवेदन दिले. शिक्षकांना २० दिवसांसाठी कार्यमुक्त करावे आणि प्रत्येक शिक्षकास इतर शासकीय विभागातून एक सहाय्यक द्यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.
जामनेर | प्रतिनिधी विशेष गहन पुनरिक्षण (SIR) अर्थात मतदार यादीच्या पुनर्निरीक्षण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांवर वाढलेल्या अतिरिक्त कामाच्या ताणाविरोधात जामनेर तालुक्यातील शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत. या संदर्भात प्रादेशिक शिक्षक संघटना, जळगाव जिल्हा, माध्यमिक शिक्षक संघटना, जामनेर तालुका तसेच इतर प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी तहसीलदारांना निवेदन सादर करून महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, SIR अंतर्गत मतदार यादीचे पुनर्निरीक्षण, कागदपत्रांची पडताळणी, माहिती संकलन व विविध प्रशासकीय प्रक्रिया अत्यंत वेळखाऊ आणि जबाबदारीच्या आहेत. याच कालावधीत शिक्षकांना नियमित अध्यापन, शाळेतील प्रशासकीय कामे आणि विविध शैक्षणिक उपक्रमही सांभाळावे लागत असल्याने दुहेरी जबाबदारी निर्माण झाली आहे.
शिक्षकांनी म्हटले आहे की, या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आणि शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे SIR चे काम प्रभावीपणे आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी शिक्षकांना किमान २० दिवसांसाठी शाळेतील अध्यापन कार्यातून कार्यमुक्त करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, प्रत्येक शिक्षकाला SIR मोहिमेदरम्यान आवश्यक कागदपत्रांची पडताळणी, माहिती संकलन आणि इतर प्रशासकीय कामांसाठी इतर शासकीय विभागातून एक सहाय्यक उपलब्ध करून द्यावा, अशीही मागणी करण्यात आली. सहाय्यक उपलब्ध झाल्यास काम अधिक वेगाने, अचूकपणे आणि निर्धारित वेळेत पूर्ण करता येईल, असा विश्वास शिक्षकांनी व्यक्त केला.
दरम्यान, तहसीलदारांनी शिक्षकांचे निवेदन स्वीकारून त्यातील मागण्या वरिष्ठ स्तरावर पाठविण्याचे आश्वासन दिल्याची माहिती शिक्षक प्रतिनिधींनी दिली.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
Social Plugin
जळगाव जिल्ह्यातील माहिती आणि न्यूज थेट आपल्या व्हाट्सअपवर लिंक वर क्लिक करा
0 टिप्पण्या