Ticker

6/recent/ticker-posts

Translate

Ad Code

Jalgaon : दानाबाजारातील अतिक्रमण स्वतःहून हटवण्यासाठी व्यापाऱ्यांना 1महिन्याची मुदत

जळगाव दानाबाजारातील अतिक्रमण हटवण्यासाठी व्यापाऱ्यांना एक महिन्याची मुदत; मनपा, वाहतूक पोलीस आणि व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय




जळगाव | प्रतिनिधी शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या दानाबाजार परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी जळगाव महानगरपालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. व्यापाऱ्यांनी दुकानांसमोर केलेले अनधिकृत अतिक्रमण स्वतःहून हटवण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली असून, त्यानंतर अतिक्रमण कायम राहिल्यास महानगरपालिकेकडून थेट कारवाई करण्यात येणार आहे.

दानाबाजार हा धान्य व किराणा व्यापाराचा प्रमुख बाजार असल्याने येथे दररोज ग्राहक आणि मालवाहू वाहनांची मोठी वर्दळ असते. अनेक व्यापाऱ्यांनी दुकानांसमोर रस्त्यावर वेदरशेड, पक्के ओटे आणि इतर अतिक्रमणे केल्याने मालवाहू वाहने मुख्य रस्त्यावर उभी राहत असून, त्यामुळे या भागात कायमस्वरूपी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.

यापूर्वी मनपाच्या नगररचना विभागाने अतिक्रमणांचे मोजमाप करून संबंधित व्यापाऱ्यांना पाच दिवसांत अतिक्रमण हटवण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या. मात्र, ही मुदत अत्यंत कमी असल्याचे सांगत व्यापारी असोसिएशनने मनपा आयुक्त आदित्य जीवने यांची भेट घेतली.

यानंतर महानगरपालिका, वाहतूक पोलीस आणि व्यापारी असोसिएशन यांची संयुक्त बैठक झाली. बैठकीत व्यापाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन देत अतिक्रमण स्वतःहून हटवण्यासाठी अधिक वेळ देण्याची विनंती केली.

व्यापाऱ्यांची मागणी लक्षात घेऊन मनपा आयुक्त आदित्य जीवने यांनी एका महिन्याची मुदतवाढ मंजूर केली. या कालावधीत व्यापाऱ्यांनी स्वखर्चाने अतिक्रमण हटवायचे असून, मुदत संपल्यानंतर अतिक्रमण कायम राहिल्यास मनपाकडून कारवाई करण्यात येणार आहे.

या निर्णयामुळे दानाबाजारातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या