आषाढी एकादशीच्या दिवशी धक्कादायक प्रकार; प्रशासनाकडे लेखी तक्रार, नंबर प्लेट नसल्याने कारवाईवर प्रश्नचिन्ह
जळगाव | प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी शाळेतील लहान मुलांच्या दिंडीदरम्यान भरधाव डंपर घुसल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी काही क्षणांसाठी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. तक्रारदाराने या प्रकरणी चालकावर उर्मट वर्तन करत अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न केल्याचाही गंभीर आरोप केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जे. ई. स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त लहान मुलांची दिंडी उत्साहात सुरू होती. त्याचवेळी नंबर प्लेट नसलेला रेतीने भरलेला डंपर दिंडीच्या मार्गात आल्याचा दावा करण्यात आला आहे. प्रसंगावधान राखल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेनंतर नागरिकांनी चालकाला जाब विचारला असता, त्याने उर्मट भाषा वापरल्याचा तसेच वाहन थेट अंगावर घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. परिसरात नागरिकांची गर्दी होताच चालकाने डंपर मागे घेतला, काही अंतरावर रेती रस्त्याच्या कडेला टाकली आणि घटनास्थळावरून पळ काढल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.
या प्रकरणी संबंधित प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून, घटनेचा व्हिडिओ आणि चालकाची माहिती उपलब्ध असल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. मात्र, डंपरवर नंबर प्लेट नसल्यामुळे कारवाई टाळली जाईल का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेतील सर्व आरोप तक्रारदाराच्या निवेदनावर आधारित आहेत. संबंधित डंपर चालक, वाहनमालक किंवा प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. तक्रारीच्या अनुषंगाने तपासानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

0 टिप्पण्या