Ticker

6/recent/ticker-posts

Translate

Ad Code

Dharangaonविद्यार्थ्यांनी घेतली सायबर सुरक्षिततेची शपथ; पी.आर. हायस्कूल व इंदिरा गांधी कन्या माध्यमिक विद्यालयात सायबर जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद



धरणगाव | प्रतिनिधी डिजिटल युगात वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित इंटरनेट वापराबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील सायबर वॉरियर्स विद्या विशाल सोनवणे आणि साक्षी तानाजी पाटील यांनी महाराष्ट्र सायबर विभागाच्या जनजागृती अभियानांतर्गत पी.आर. हायस्कूल तसेच इंदिरा गांधी कन्या माध्यमिक विद्यालय येथे सायबर सुरक्षा जनजागृती सत्रांचे प्रभावी आयोजन केले.

या उपक्रमात विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणूक, सोशल मीडिया सुरक्षा, बनावट वेबसाइट्स आणि लिंक, ओटीपी व पासवर्डची गोपनीयता, सायबर गुन्ह्यांपासून बचावाचे उपाय, डिजिटल फूटप्रिंटचे महत्त्व आणि सुरक्षित इंटरनेट वापराविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. दैनंदिन जीवनातील उदाहरणांच्या माध्यमातून सायबर गुन्ह्यांचे विविध प्रकार आणि त्यापासून बचावासाठी आवश्यक खबरदारी समजावून सांगण्यात आली.


यावेळी मोबाईलचा योग्य वापर, ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना घ्यावयाची काळजी, अनोळखी व्यक्तींशी सोशल मीडियावर संवाद साधताना आवश्यक असलेली सतर्कता तसेच वैयक्तिक माहिती शेअर करण्याचे धोके याविषयी विद्यार्थ्यांना विशेष माहिती देण्यात आली.

सत्रादरम्यान विद्यार्थ्यांनी उत्साहाने प्रश्न विचारत चर्चेत सक्रिय सहभाग नोंदवला. अनेक विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षेबाबत अधिक जाणून घेण्याची उत्सुकता व्यक्त केली. संवादात्मक पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना विषय अधिक सहज आणि प्रभावीपणे समजला.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षिततेची शपथ घेत स्वतः सुरक्षित राहण्याबरोबरच आपल्या कुटुंबीय, मित्र-मैत्रिणी आणि समाजातही सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करण्याचा संकल्प केला. तसेच अशा प्रकारचे मार्गदर्शनपर उपक्रम नियमितपणे आयोजित करावेत, अशी अपेक्षाही विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.


हा उपक्रम आर. बी. आमले सर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला. पी.आर. हायस्कूलचे प्राचार्य दिनेश पाटील तसेच इंदिरा गांधी कन्या माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य ए. ए. पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सुरक्षित डिजिटल समाज घडविण्यासाठी अशा जनजागृती मोहिमांची सातत्याने गरज असल्याचे मत व्यक्त केले. दोन्ही शाळांतील शिक्षकांनीही उपक्रमाला उत्स्फूर्त सहकार्य केले.

विद्यार्थ्यांचा सकारात्मक प्रतिसाद, सक्रिय सहभाग आणि सायबर सुरक्षेबाबत दाखविलेली जागरूकता यामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला. समाजात सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता वाढविणे, सुरक्षित डिजिटल सवयी रुजविणे आणि जबाबदार डिजिटल नागरिक घडविण्याच्या दिशेने हा उपक्रम प्रेरणादायी ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.\



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

0