मुक्ताईनगर | जळगाव न्यूज आषाढी एकादशीनिमित्त दि. २४ जून २०२६ रोजी मुक्ताईनगर येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या श्री संत मुक्ताई पालखी सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या मातोश्री स्व. गंगुबाई संभाजी शिंदे यांच्या स्मरणार्थ भव्य, आकर्षक आणि सर्व सुविधांनी सुसज्ज असा रथ समर्पित केला आहे.
पालखी सोहळ्याच्या गरजेनुसार तयार करण्यात आलेल्या या रथाचे काम पूर्ण झाल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तयारीचा आढावा घेतला. संत मुक्ताई संस्थेच्या मागणीनुसार साकारण्यात आलेला हा रथ पालखी सोहळ्याच्या वैभवात भर घालणारा ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
विशेष म्हणजे, दि. २४ जून २०२६ रोजी होणाऱ्या पालखी प्रस्थान सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
यावेळी श्री संत मुक्ताई संस्थेचे अध्यक्ष रवींद्र भैय्यासाहेब पाटील, पालखी सोहळा प्रमुख हरणे महाराज, पंजाबराव पाटील, उद्धव महाराज जुनारे, सम्राट पाटील, विनायक महाराज, शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख हितेश पाटील, ज्ञानेश्वर हरणे, गणेश पाटील, पियुष महाजन, सोपान मराठे, स्वप्निल श्रीखंडे, तसेच वारकरी बांधव आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री संत मुक्ताई महाराजांच्या कृपेने यंदाचा पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

0 टिप्पण्या