जळगाव न्यूज : पाचोरा तालुक्यातील शेवाळे गावात गुरुवारी रात्री उशिरा एक धक्कादायक घटना घडली. घरात एकटी असलेल्या ८५ वर्षीय वृद्धेची रॉडने डोक्यात मारून निर्घृण हत्या करण्यात आली. यानंतर मारेकऱ्याने तिच्या गळ्यातील मंगळसूत्र व कानातील सोन्याच्या बाळ्या जबरदस्तीने ओरबडून घेत पळ काढला. ही क्रूर घटना गावात रात्री १०.३० वाजेच्या सुमारास घडली असून, या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
मृत महिला जनाबाई महारू पाटील (वय ८५) या शेवाळे गावातील रहिवासी होत्या. त्या शेजारील मातीच्या घरात एकट्याच राहत होत्या. त्यांचा मुलगा कृष्णराव पाटील हे दोन मजली घरात राहत असून, गुरुवारी रात्री पाचोरा येथे मित्राच्या मुलाच्या वाढदिवसाला गेले होते. साडेअकरा वाजता घरी परतल्यानंतर त्यांनी आई झोपलेली असेल या अपेक्षेने तिच्या खोलीकडे धाव घेतली. मात्र, तिथे त्यांनी पाहिलेले दृश्य अंगावर काटा आणणारे होते.
जनाबाई पाटील या रक्ताच्या थारोळ्यात पलंगाखाली पडलेल्या अवस्थेत होत्या. त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने जबर मारहाण करून दोन तुकडे केले होते. मृतदेहावर पांघरून टाकून मारेकरी पसार झाले होते. यावेळी घरात ठेवलेले गळ्यातील एक तोळ्याचं मंगळसूत्र व कानातील दोन तोळ्यांचे दागिनेही चोरून नेण्यात आले होते.
घटनेची माहिती मिळताच कृष्णराव पाटील यांनी आरडाओरड केली. शेजारी धावत आले व त्यांनी लगेचच पोलिसांना पाचारण केलं. पिंपळगाव हरे पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तत्काळ एलसीबी, डॉग स्कॉड व फॉरेन्सिक टीमला पाचारण केलं. डॉग स्कॉडने गावातच फिरकत असल्याने मारेकरी गावातीलच असण्याचा पोलिसांना संशय आहे.
घटनास्थळी अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, डीवायएसपी धनंजय वेरूळे, पोलिस निरीक्षक प्रकाश काळे, उपनिरीक्षक विठ्ठल पवार यांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. पोलिसांकडून शंका घेण्यात येणाऱ्या काही व्यक्तींना ताब्यात घेऊन चौकशी सुरू असून, लवकरच आरोपीला अटक होईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून गावकऱ्यांनी पोलिस बंदोबस्त वाढवण्याची मागणी केली आहे. वृद्ध महिलेचा मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला होता. तेथे डॉ. अमित साळुंखे यांनी शवविच्छेदन केले. पुढील तपास पिंपळगाव हरे पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.
0 टिप्पण्या