Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Mumbai News : वेव्हज् 2025 शिखर परिषदेचे उद्घाटन 1 मे रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते


मीडियाच्या जागतिक केंद्रासाठी भारताचा पुढाकार; मुंबईत वेव्हज् परिषदेस सुरुवात

मुंबई - भारताच्या पहिल्या जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषदेचे (WAVES 2025) उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 1 मे रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे होणार आहे. या महत्त्वपूर्ण परिषदेचे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आले असून, यामुळे भारताच्या मीडिया व डिजिटल क्षेत्रातील सर्जनशीलतेला जागतिक व्यासपीठ मिळणार आहे.




या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

“कनेक्टिंग क्रिएटर्स, कनेक्टिंग कंट्रिज” या घोषवाक्याखाली होणाऱ्या या चार दिवसीय शिखर परिषदेचा उद्देश भारताला मीडिया, मनोरंजन आणि डिजिटल नवप्रवर्तनाच्या जागतिक केंद्र म्हणून प्रस्थापित करणे हा आहे. यामध्ये चित्रपट, ओटीटी, गेमिंग, कॉमिक्स, डिजिटल मीडिया, एव्हीजीसी-एक्सआर, कृत्रिम बुद्धिमत्ता व प्रसारण या क्षेत्रांचा समावेश असेल.

या परिषदेत पहिल्यांदाच ग्लोबल मीडिया डायलॉग (GMD) चे आयोजन मुंबईत होत असून, २५ देशांचे मंत्री सहभागी होणार आहेत. याव्यतिरिक्त, WAVES बाजार या जागतिक ई-मार्केटप्लेसमध्ये 6,100 खरेदीदार, 5,200 विक्रेते आणि 2,100 प्रकल्प सहभागी होणार आहेत, ज्यातून व्यवसाय आणि नेटवर्किंगच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत.

पंतप्रधान मोदी “क्रिएट इन इंडिया” उपक्रमांतर्गत क्रिप्टोस्पियरला भेट देऊन निवड झालेल्या कलाकारांशी थेट संवाद साधणार आहेत. भारत पॅव्हिलियन आणि महाराष्ट्र पॅव्हिलियनला देखील ते भेट देतील.

या भव्य परिषदेत ९० हून अधिक देशांतील १०,००० प्रतिनिधी, १,००० कलाकार, ३०० हून अधिक कंपन्या आणि ३५० स्टार्टअप्स सहभागी होणार असून, ४२ मुख्य सत्रे, ३९ विशेष सत्रे आणि ३२ मास्टरक्लासेस आयोजिले जातील. हे सत्र विविध डिजिटल व मनोरंजन क्षेत्रांमध्ये भारताचे जागतिक नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी मोलाचे ठरणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या