जळगाव : भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा संघटनेत यंदा लेवा पाटील समाजाला नेतृत्वाची संधी मिळण्याची शक्यता अत्यल्प असून, नेतृत्वाचे स्थान दोन मराठा आणि एक गुर्जर समाजाकडे जाण्याचे संकेत आहेत. जिल्ह्यात भाजपच्या अंतर्गत संघटनात्मक निवडणुकीस प्रारंभ झाला असून, तीन प्रमुख जिल्हाध्यक्ष पदांसाठी हालचालींना वेग आला आहे.
जळगाव लोकसभा (पश्चिम), रावेर लोकसभा (पूर्व) आणि जळगाव शहर अशा तीन भागांतून जिल्हाध्यक्षांची निवड होणार आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात जामनेरचे चंद्रकांत बाविस्कर यांचे नाव आघाडीवर असून, ते संघटनेतून पुढे आलेले आहेत. जळगाव लोकसभा मतदारसंघात डॉ. राधेश्याम चौधरी यांची शक्यता प्रबळ असून, पी. सी. पाटील आणि मधुकर काटे यांचीही नावे चर्चेत आहेत.
जळगाव शहरात माजी महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी आणि रोहित निकम यांच्यात चुरशीची स्पर्धा आहे. या दोघांनीही आपापली दावेदारी मंत्री गिरीश महाजन यांच्यापर्यंत पोहोचवली आहे. शनिवारी दोघांनीही महाजन यांची भेट घेऊन पाठिंबा मागितला. यामुळे भाजप महानगरात दोन गट उभे राहत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
विशेष म्हणजे, या सर्व चर्चेत एकही लेवा समाजाचा प्रमुख चेहरा नसल्यामुळे १५ वर्षांनंतर प्रथमच भाजपच्या संघटनेत लेवा समाजाला हुलकावणी मिळण्याची शक्यता आहे. परंपरागतपणे जिल्ह्यात राजकारणावर मजबूत पकड असलेल्या लेवा समाजासाठी ही स्थिती धक्कादायक ठरू शकते.
संघटनेतील या बदलामुळे भाजपमध्ये समाजीय समसमानतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येण्याची चिन्हं आहेत.
0 टिप्पण्या