Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

JALGAON NEWS जळगावात अल्पवयीन मुलींचे अपहरणाच्या घटना वाढल्या; पोलिस तपास यंत्रणा सतर्क

JALGAON CRIME NEWS जळगाव - शहरात आणि तालुक्यात अल्पवयीन मुलींच्या बेपत्ता होण्याच्या आणि फूस लावून पळवून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून, चार वेगवेगळ्या प्रकरणांमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. चिंतेचा विषय म्हणजे या सर्व घटना आठवड्याभराच्या कालावधीत घडल्या असून, पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी या घटनांची गंभीर दखल घेत तपासाची चक्रे वेगात फिरवली आहेत.


कालिंकामाता मंदिर परिसरातील १७ वर्षीय मुलगी बेपत्ता

मंगळवारी दुपारी १२ वाजता कालिंकामाता मंदिर परिसरात राहणारी १७ वर्षीय मुलगी गावात जाऊन येते असे सांगून घरातून बाहेर गेली. मात्र ती परत आली नाही. तिच्या आईने शनिपेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मुलीचे वर्णन – जाडसर बांधा, गोल चेहरा, ५ फूट उंची, स्कीन कलर टॉप, लेगीन्स आणि गुलाबी स्कार्फ असे आहे. उपनिरीक्षक प्रिया दातीर तपास करत आहेत.

चिंचोलीतील विवाहिता आणि चार वर्षीय मुलगा बेपत्ता
चिंचोली (ता. जळगाव) येथील ३७ वर्षीय विवाहित महिला मंगळवारी दुपारी ३ वाजता कोणालाही न सांगता चार वर्षाच्या मुलासह बेपत्ता झाली. सुरेश पवार यांच्या तक्रारीनुसार या घटनेची नोंद एमआयडीसी पोलिस ठाण्यात करण्यात आली. महिलेला फिकट निळी साडी आणि निळा ब्लाउज होता, तर मुलाला गुलाबी टी-शर्ट आणि निळ्या जिन्स होती. तपास अधिकारी किरण पाटील कार्यरत आहेत.

फुले मार्केटमधून खरेदीला आलेली मुलगी बेपत्ता
आव्हाणे येथील अल्पवयीन मुलगी शुक्रवारी काकूसोबत फुले मार्केट येथे खरेदीसाठी आली होती. ती तहान लागल्याने पाणी पिऊन येते असे सांगून गेल्यानंतर परत आली नाही. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध पळवून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीचे वर्णन – सावळी, ५ फूट उंची, हिरव्या रंगाचा टॉप, पांढरी पैंट, उजव्या हातावर पांढरा डाग. तपास महेश घायतळ करत आहेत.

तांबापुरा परिसरातून १३ वर्षांची मुलगी पळवली
शहरातील तांबापुरा परिसरात राहणारी १३ वर्षीय मुलगी शनिवारी पहाटे सहा वाजण्यापूर्वी घरातून गायब झाली. तिच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात व्यक्तीने फूस लावून तिला पळवून नेले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

या चारही घटनांमुळे जळगाव जिल्ह्यात बाल सुरक्षा आणि महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले असून, तपास सुरु आहे. प्रशासनाने या घटनांची गांभीर्याने दखल घेत शहरात गस्त वाढवणे, सीसीटीव्ही चेकिंग आणि जनजागृती करणे आवश्यक आहे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या