Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

JALGAON NEWS : आत्महत्येच्या उंबरठ्यावर बेबसपणा : मोबाईल दुरुस्तीस पैसे न मिळाल्याने १९ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली

जळगाव शहरातील कांचननगर भागात रविवारी एक हृदयद्रावक घटना घडली. केवळ मोबाईल दुरुस्तीसाठी पैसे न मिळाल्याने १९ वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. मृत युवकाचे नाव योगेश घनश्याम काळे असून, तो आईसोबत मामाकडे वास्तव्यास होता. ही घटना रविवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.


योगेशच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. आईचे दोन्ही हात अधू असल्याने ती स्वयंपाक करू शकत नव्हती. योगेश आपल्या आईला स्वतः पोळी मोडून खाऊ घालत असे. काही महिन्यांपूर्वी त्याने फुले मार्केट परिसरात कटलरी विक्रीसाठी गाडी सुरू केली होती. त्याच कमाईतून त्याने मोबाइल खरेदी केला होता.

घटनेच्या दिवशी मोबाईल दुरुस्तीसाठी पैसे हवे होते, मात्र घरच्यांकडून पैसे मिळाले नाहीत. संतापाच्या भरात त्याने मोबाईल फेकून दिला आणि तो फुटला. त्यानंतर कोणालाही काही न सांगता घरात कोणी नसताना गळफास घेतला. नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी तातडीने जीएमसी रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वडील नसल्याने जबाबदारीची ओझी लहान वयातच खांद्यावर घेतलेल्या योगेशने असे टोकाचे पाऊल उचलल्याने मित्रमंडळी व कुटुंबीय आक्रोशात आहेत.

शनीपेठ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या