जळगाव :- चारित्र्यावर संशय घेत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. यासोबतच माहेराहून ५ लाख रुपये आणण्यासाठी दबाव टाकल्याच्या कारणावरून पतीसह तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे शहरात संतापाची लाट पसरली आहे.
तक्रारदार यास्मिन बी शकील बागवान (वय २८, रा. सुप्रीम कॉलनी) हिने दिलेल्या तक्रारीनुसार, तिचा पती शकील रशीद बागवान, सासरे रशीद गनी बागवान आणि दीर शाहरुख बागवान (रा. एरंडोल) यांनी तिच्यावर विविध आरोप लावून मानसिक छळ केला. त्याचप्रमाणे, गाडी घेण्यासाठी तिच्या माहेराहून ५ लाख रुपये आणण्याची मागणी वारंवार करण्यात आली.
यास्मिन बागवान हिने विरोध दर्शवल्यावर तिच्यावर चारित्र्याच्या संशयाचे आरोप करून तिला वेगवेगळ्या प्रकारे छळले गेले. तिला सतत त्रास दिला जात होता आणि शिवीगाळ, दमदाटी करून तिचे जीवन असह्य केले जात होते, असे तक्रारीत नमूद आहे.
पीडितेच्या तक्रारीनुसार एमआयडीसी पोलिसांनी तिन्ही आरोपींविरोधात कलम 498(A), 504, 506 तसेच कलम 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून तपास सुरू असून आरोपींच्या अटकेसाठी प्रयत्न केले जात आहेत.
या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी महिला संघटनांकडून होत आहे. महिलांवरील अत्याचारासंदर्भात प्रशासनाने गंभीर भूमिका घेण्याची गरज आहे, असे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
0 टिप्पण्या