चाळीसगाव – चाळीसगाव वन विभागाने नुकत्याच केलेल्या कारवाईत पाच हरणांची बेकायदेशीर शिकार करणाऱ्या एका शिकाऱ्याला अटक करण्यात यश आले आहे. वकील अहमद शकील अहमद (वय २८, रा. मालेगाव) या आरोपीला वन विभागाने शिताफीने सापळा रचून अटक केली असून, त्याच्याकडून अन्य फरार चौघांबाबत माहिती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर १७ मेपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.
ही कारवाई ३० एप्रिल रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास चाळीसगाव बायपास ते धुळे शहरापर्यंत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाठलाग करत केली. चाळीसगाव वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे यांना एका इनोव्हा कारमधून बेकायदेशीरपणे हरणांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर उपवनसंरक्षक प्रवीण ए. आणि सहाय्यक वनसंरक्षक उमेश बिरासदार यांच्या मार्गदर्शनाखाली नगराळे आणि त्यांच्या पथकाने बायपासवर सापळा रचला.
छत्रपती संभाजीनगरहून धुळ्याकडे भरधाव वेगाने जाणारी एक इनोव्हा कार पथकाच्या नजरेस पडली. कार थांबविण्याचा इशारा देण्यात आला असता, संशयितांनी वाहन न थांबवता धुळेच्या दिशेने पळ काढला. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाठलाग सुरू केला. अखेर धुळेजवळ कार थांबवून, वाहनातील पाच संशयित जंगलात पळून गेले.
पथकाने सदर इनोव्हा कार जप्त केली असून तिच्यात पाच मृत हरणांचे अवशेष सापडले. हे प्रकरण वन्यजीव संरक्षण कायदा अंतर्गत गंभीर गुन्हा असून, फरार चौघा आरोपींचा शोध सुरू आहे. आरोपी वकील अहमदच्या अटकेनंतर या रॅकेटमागील संपूर्ण जाळं उघड होण्याची शक्यता वन विभागाने व्यक्त केली आहे.
वन्यजीवांची तस्करी आणि शिकार थांबवण्यासाठी वन विभागाचा हा सक्रिय प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे. या घटनेमुळे वन्यजीव सुरक्षेच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा गंभीरपणे विचार करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
0 टिप्पण्या