Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

JALGAON NEWS सावधान शेतकऱ्यांनो! प्रतीक्षा यादी बदलून सौरपंप देतो म्हणणारे कॉल बनावट – महावितरणचा इशारा

जळगाव :-  'मागेल त्याला सौर कृषीपंप' या योजनेला राज्यातील शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. महावितरणकडून या योजनेअंतर्गत नोंदणीच्या क्रमानुसार सौर कृषीपंप बसवले जात असून, संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि ऑनलाइन पद्धतीने राबवली जात आहे. मात्र, अलीकडे काही शेतकऱ्यांना प्रतीक्षा यादी डावलून तात्काळ सौरपंप देण्याच्या बनावट कॉल्स येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.



या कॉलमध्ये काही जण स्वतःला अधिकृत प्रतिनिधी म्हणून भासवून शेतकऱ्यांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा बनावट कॉल्सना बळी न पडण्याचे आणि कोणत्याही परिस्थितीत कोणालाही पैसे न देण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

महावितरणच्या माहितीनुसार, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना केवळ 10% रक्कम भरावी लागते. उर्वरित 90% अनुदान केंद्र आणि राज्य सरकारकडून दिले जाते. अनुसूचित जाती-जमातीच्या शेतकऱ्यांसाठी ही रक्कम केवळ 5% इतकी आहे. एकदा पंप बसवला की, पुढील 25 वर्षे वीज बिलाची चिंता राहात नाही, कारण सौर पॅनेल्सद्वारे दिवसा वीज पुरवठा करण्यात येतो.

कोणताही पंप प्रतीक्षा यादी डावलून देण्यात येत नाही. शेतकऱ्यांनी अधिकृत संकेतस्थळावरच नोंदणी करावी आणि कोणत्याही संशयास्पद कॉल किंवा मेसेजसंदर्भात महावितरणच्या टोल फ्री क्रमांक 18002333435 किंवा 18002123435 वर तात्काळ तक्रार नोंदवावी. तसेच जवळच्या महावितरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक आणि सजग राहूनच या योजनेचा लाभ घ्यावा, अन्यथा फसवणुकीचे बळी ठरू शकते, असा इशाराही महावितरणने दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या