जळगाव शहरात एका ७० वर्षीय वृद्ध वकील महिलेला बनावट बांधकाम प्रकल्पात गुंतवणूक करायला लावून लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या तिघा आरोपींचा जामीन अर्ज कोर्टाने शुक्रवारी फेटाळून लावला. या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली असून वरिष्ठ नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांविरोधात पोलिसांची कारवाई सुरू आहे.
फसवणुकीची शिकार झालेली महिला वकील शिरीन अमरोलीवाला यांना आरोपींनी बनावट कंपनीत पैसे गुंतवल्यास भरघोस नफा व मुंबईत फ्लॅट देण्याचे आमिष दाखवले होते. या आमिषाला भुलून त्यांनी मोठ्या रकमेची गुंतवणूक केली. मात्र, नफा तर सोडाच, कंपनी आणि फ्लॅट दोन्ही हवेत विरले.
याप्रकरणी शिरीन अमरोलीवाला यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मनिष सतीश जैन, अतुल सतीश जैन आणि विजय इंदरचंद ललवाणी या तिघांना अटक केली. एकूण पाच जणांविरोधात गुन्हा दाखल आहे.
आरोपींनी कोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता, परंतु पोलीस बाजू ऐकून घेत कोर्टाने जामीन फेटाळत त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा निर्णय दिला. या निर्णयामुळे वृद्ध व ज्येष्ठ नागरिकांना न्याय मिळवून देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पुढील तपास शहर पोलीस करीत असून उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू आहे.
0 टिप्पण्या