जळगाव – माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या शैक्षणिक संस्थेने जिल्हा बँकेकडून घेतलेल्या १० कोटी रुपयांच्या कर्जप्रकरणाची चौकशी सोमवारी सुरू करण्यात आली. विशेष म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटात त्यांचा प्रवेश झाल्याच्या केवळ २४ तासांत ही कारवाई सुरू झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
धुळे जिल्हा उपनिबंधकांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूरचे सहायक निबंधक राजेंद्र वीरकर यांच्या नेतृत्वात पथक जळगाव जिल्हा बँकेत दाखल झाले. सकाळी १०.३० वाजता सुरू झालेल्या या कारवाईत बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांची भेट घेऊन कर्जासंबंधी बारकावे जाणून घेण्यात आले. यावेळी संबंधित कागदपत्रे ताब्यात घेऊन पथक धुळ्याकडे रवाना झाले.
या कर्जप्रकरणात झुरखेडा येथील सुरेश पाटील यांनी तक्रार दाखल केली असून, त्यानुसार ही चौकशी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, कार्यकारी संचालक देशमुख यांनी बँकेकडून संपूर्ण सहकार्य होत असल्याचे स्पष्ट केले.
शनिवारी देवकरांसह खान्देशातील पाच माजी आमदारांनी राष्ट्रवादी (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर लगेचच ही चौकशी सुरू झाल्याने ही कारवाई राजकीय सूडभावनेतून झाली का? याबाबत चर्चांना उधाण आले आहे.
0 टिप्पण्या